नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात मागील 90 दिवसांपासून तुरूंगात असणारे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी आता सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणी घेण्याचे सांगितले आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यात दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम यांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Supreme Court agrees to hear an appeal of Congress leader P Chidambaram against Delhi High Court order refusing bail to him in INX Media money laundering case. A Bench headed by Chief Justice SA Bobde says it would hear the plea on Tuesday or Wednesday. (file pic) pic.twitter.com/lpDShPGUiN
— ANI (@ANI) November 18, 2019
आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला. पण त्याआधीच या प्रकरणातील पैशांच्या व्यवहारावरून सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे सीबीआयच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतरही ईडीच्या प्रकरणात त्यांना अटकेत राहावे लागले आहे.
चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सोमवारी त्यांच्या जामिनासाठी याचिका दाखल केली. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यीय खंडपीठाने कामकाज सुरू केल्यावर लगेचच या याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी कपिल सिब्बल यांनी केली. गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन देण्यास नकार दिला होता. ही बाब कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. गेल्या 90 दिवसांपासून चिदंबरम तिहार तुरुंगात अटकेत आहेत.