“ई सर्च’ प्रणालीच्या माध्यमातून मिळणार मालमत्ता व्यवहाराची माहिती
पुणे – जमीन, सदनिका अथवा दुकाने आदींचे जुने दस्ताऐवज शोधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने “ई सर्च’ ही संगणक प्रणाली सुरू केली आहे. आता या पुढे जाऊन नोंदणी व मुद्राक विभागाने दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी झाल्यावरच लगेच ते “ई सर्च’ प्रणालीमध्ये अपलोड केले जात आहे. रियल टाईमध्ये “ई सर्च’वर दस्ताऐवज उपलब्ध होत असल्याने नागरिकांना संबंधित मालमत्तेचा मालक कोण आहे, संबंधित मालमत्तेचा व्यवहार कधी झाला, याची माहिती तत्काळ घरबसल्या मिळत आहे. यामुळे जमीन, सदनिका यांच्या खरेदी-विक्रीच्या गैरप्रकाराला आळा बसण्यास मदत झाली आहे.
देशात पहिल्यांदाच रियल टाईममध्ये दस्ताऐवज ऑनलाइन उपलब्ध करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. मागील 7 वर्षांत 34 कोटी 31 लाख नागरिकांनी “ई सर्च’ प्रणालीला भेट दिली आहे. तर दररोज सरासरी सुमारे 20 ते 25 हजार नागरिक हा प्रणालीला भेट देत असून मालमत्तेची मालकी हक्काची पडताळणी करत आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्यात अग्रेसर आहे. याचाच एक भाग म्हणून खरेदी-विक्री व्यवहाराचे जुने दस्त ऑनलाइन पाहण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक्र विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
याच्याच पुढच्या टप्प्यात नोंदणी झालेले दस्त लगेचच “ई सर्च’मध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे. एकाच जागेची किंवा सदनिकांची विक्री अनेकांना विकण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. यामध्ये खरेदीदाराची आर्थिक फसवणूक होते. तसेच एक सदनिका अनेक बॅंकेत गहाण ठेवून त्याआधारे कर्ज घेतल्याचे प्रकारही घडतात.
दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झालेले दस्त लगेच “ई सर्च’ मिळत असल्याने मालमत्तेचा मालक कोण, खरेदी-विक्री व्यवहार कधी झाला याची माहिती नागरिकांना मिळत आहे. “ई सर्च’वर जमिनीच्या सर्व्हेनंबर अथवा गटनंबरनुसार त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्डच्या नंबरनुसारही मालमत्तेची माहिती मिळत आहे. “ई सर्च’मध्ये 2002 ते आजपर्यंतचे दस्त उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या दस्त पाहता येतात. “ई सर्च’ या सुविधेचा वापर करून शोधलेल्या दस्ताची अथवा दस्तांच्या सूचीची (इंडेक्स) प्रत डाऊनलोडही येते.
“ई सर्च’ ही सुविधा नागरिकांना फायदेशीर ठरत आहे. संबंधित मिळकतीच्या मालकी हक्काचा पूर्व इतिहास नागरिकांना या प्रणालीमध्ये उपलब्ध होत आहे. जमीन, सदनिका आदी मालमत्तेची खरेदी-विक्री करण्यापूर्वी नागरिकांनी “ई सर्च’ प्रणालीचा वापर करून मालकी हक्काची पाहणी करावी.
– अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य