नवी दिल्ली :- राज्यसभेने आठ संसदीय स्थायी समित्यांची पुनर्रचना केली आहे. त्यात गृह विभागाच्या स्थायी समितीवर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यसभेच्या अध्यक्षांनी गृह प्रकरणांवरील संसदीय स्थायी समितीत एकूण 31 जणांची नियुक्ती केली आहे. या स्थायी समितीत केंद्र सरकारच्या तीन महत्त्वाच्या विधेयकांवर निर्णय होणार आहे. त्यात फौजदारी कायदा, भारतीय दंडसंहिता आणि भारतीय पुरावा कायदा या तीन कायद्यांच्या जागी तीन नवीन कायदे आणले जाणार आहेत. त्यामुळे त्या समितीत चिदंबरम यांचा समावेश होण्याला महत्त्व दिले जात आहे.
कॉंग्रेसचे पी. भट्टाचार्य यांच्या निवृत्तीनंतर ही जागा रिक्त असल्याने पी. चिदंबरम यांची नियुक्ती झाली. पक्षाचे लोकसभा खासदार अधीर रंजन चौधरी हेही या समितीचे सदस्य आहेत.
भाजप खासदार ब्रिजलाल या गृह विभागाच्या समितीचे अध्यक्ष आहेत. याशिवाय, राज्यसभेच्या अध्यक्षांनी कॉंग्रेस खासदार जयराम रमेश यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने आणि हवामान बदल समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.
गृह, आयटी, संरक्षण, परराष्ट्र, वित्त आणि आरोग्य या सहा प्रमुख संसदीय समित्यांचे अध्यक्ष भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांकडे आहेत.