बारामुल्ला :- जम्मू आणि काश्मीर सरकारच्या रस्ते आणि इमारती विभागातील वरिष्ठ अभियंता गुरमीत सिंग 25 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी बेपत्ता झाले होते. मंगळवारी बारामुल्ला येथील गुंटमुल्ला भागात गुरमीत सिंग मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे.
सहायक अभियंता गुरमीत सिंग बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर, बारामुल्ला पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी डीवायएसपी बारामुल्ला यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले.
एसआयटी व्यतिरिक्त, पोलिसांनी व्यापक बचाव आणि शोध मोहीम सुरू केली होती ज्यात एसडीआरएफ, श्वानपथक, ड्रोन टेहळणीचा समावेश होता आणि कोणत्याही संभाव्य सुगाव्याचा उलगडा करण्यासाठी नागरिकांचीही मदत मागितली होती.
सखोल तपास केल्यानंतर गुरमीत सिंगचा मृतदेह जिल्ह्यातील गुंटमुला येथील लोअर झेलम हायडल प्रोजेक्ट येथील कॅनॉलमध्ये पडलेला आढळला. वैद्यकीय-कायदेशीर औपचारिकतेसाठी मृतदेह घटनास्थळावरून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अभियंत्याच्या मृत्यूचे संभाव्य कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.