उद्योजकांची मागणी : प्रशासनाने घ्यावी खबरदारी
पिंपरी – शहरात करोनाची दुसरी लाट सुरु झाली असून, दररोज बाधितांचा विक्रमी आकडा समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा करोनाबाधितांसाठी ऑक्सिजन राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योगांना आता उत्पादनाच्या केवळ 20 टक्के ऑक्सिजन मिळणार आहे. ऑक्सिजन आधी रुग्णांनाच पुरवा परंतु उद्योगांकडे येताना त्याचा काळाबाजार होऊन किंमती वाढणार नाहीत, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
गेल्यावर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्याने मृत्यूंचा आकडा वाढू लागला होता. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य सरकारने 7 सप्टेंबरला ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत अध्यादेश काढला होता. त्यावेळी पहिल्याच दिवशी ऑक्सिजनविना उद्योगांची दमछाक झाली होती. उद्योगांना ऑक्सिजन सिलिंडर तिप्पट दराने विकत घ्यावे लागले होते. परिस्थितीचा गैरफायदा घेतला जाऊ नये, शॉर्टेज आहे म्हणून दर वाढले अशी कारणे देत कुणालाही काळाबाजार करण्याची मुभा देऊ नये, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून करोनाचा उद्रेक लक्षात घेता, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात 135 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून उत्पादकांकडे 790 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्यातरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिली.
मात्र पुण्यासह राज्यभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करावी. ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही, याकरिता अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी नियोजन करावे, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले आहे. तर कोवीड-19 रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती या बैठकीत दिली.
सध्याची परिस्थिती पाहता रुग्णालयांनाच आधी ऑक्सिजन देणे गरजेचे आहे. आम्हीही त्यालाच प्राधान्य देतो. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत असला, तरीदेखील त्याचा काळाबाजार होणार नाही, याकरिता जिल्हा प्रशासनाने समिती स्थापन करावी. आम्ही मागच्याच वर्षी ऑक्सिजनचा शंभर टनाचा प्लांट तातडीने उभारण्याची मागणी केली होती. शॉर्टेजच्या नावाखाली काळाबाजार होऊ नये.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटना