लंडन – करोनाविरोधात जगभरात सुरू असलेल्या लसीच्या संशोधनात सर्वात आघाडीवर असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये लक्षणीय वाढ होत असल्यचे चाचणीदरम्यान निष्पन्न होत आहे.
या लसीची चाचणी घेतली जात असलेल्या युवा आणि प्रौढ उमेदवारांमध्ये ही रोगप्रतिकारक क्षमता वाढल्याचे आढळून आले आहे.
करोनाच्या साथीमुळे आर्थिक आणि सार्वजनिक आरोग्यासमोर उभे राहिलेले संकट दूर केले जाण्याची शक्यता अधिक वाढली आहे. ऑक्सफर्डच्या लसीचे फारच कमी विपरीत परिणाम प्रौढ उमेदवारांवर आढळून आले आहेत, असे या लसीच्या निर्मितीमध्ये भागीदार असलेल्या ऍस्ट्राझेंका या औषध कंपनीने सोमवारी म्हटले आहे. ही लस करोनाविरोधातील लढाईमध्ये “गेम चेंजर’ म्हणून सिद्ध होत आहे.
रोगप्रतिकारक शक्ती युवकांमध्ये आणि प्रौढांमध्ये सारख्याच प्रमाणात वाढत आहे. प्रौढांच्या तुलनेत
युवकांमध्ये प्रतिक्रियात्मक सुधारणांचे प्रमाण अधिक आहे.
विशेषतः ज्या भागात कोविड-19 च्या प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक आहे, तेथील प्रौढांमधील प्रतिकारशक्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे, असे ऍस्ट्राझेंकाच्या प्रवक्त्याने सांगितले.