लिबीयातून युरोपात स्थलांतर करणाऱ्यांची बोट समुद्रात बुडाली

कैरो – लिबीयातून युरोपात स्थलांतर करणाऱ्यांची एक बोट समुद्रात बुडून झालेल्या दुर्घटनेत अकरा स्थलांतरीत बुडाल्याची घटना काल घडली. त्यात एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. लिबीयाच्या समुद्र किनाऱ्या लगतच हा प्रकार घडल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतरीत निरीक्षण समितीने दिली आहे.

एका आठवड्याच्या अवधीत स्थलांतरीतांची बोट भूमध्य समुद्रात बुडण्याची ही तिसरी घटना आहे. स्थलांतरीतांची ही बोट बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर लिबीयाचे तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छिमारांनी दहा स्थलांतरीतांना वाचवून पुन्हा लिबीयाच्या तटावर आणून सोडले. गेल्या मंगळवारी झालेल्या अशाच एका घटनेत पंधरा स्थलांतरीत बुडाले होते.

यावर्षी आत्ता पर्यंत किमान पाचशे स्थलांतरीत भूमध्य समुद्रात बुडाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून लिबीयातील अस्थिर वातावरणामुळे तेथील अनेक नागरीक महिला व मुले बेकायदेशीरपणे भूमध्य समुद्रातून बोटीतून युरोपात घुसण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. अशा प्रसंगात सातत्याने त्यांच्या बोटी बुडण्याचे प्रकार होत असूनही अजून हे प्रकार थांबलेले नाहीत त्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. हे स्थलांतरीत रबराच्या छोट्या बोटींचा वापर करून युरोपात जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.