मुंबई – करोना विषाणूचा बांधकाम क्षेत्रावर जास्त परिणाम झाला नसल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळाले. मुंबईत जानेवारी 2022 मध्ये तब्बल 7 हजार 732 बांधकामांची नोंदणी झाली आहे. त्यातून सरकारला मिळणाऱ्या महसुलात 48 टक्क्यांची वाढ झाली आहे. बांधकाम श्रेत्रातील नाइट फ्रँक इंडिया या कंपनीने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
नाइट फ्रँक इंडियाच्या आकडेवारीनुसार, मुंबई शहरात जानेवारी महिन्यात रोज 249 च्या सरासरीने 7 हजार 732 युनिट्सची नोंदणी झाली आहे. या नोंदणीतून सरकारला 453 कोटींचा महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे जानेवारी 2021 च्या तुलनेत मालमत्तांची नोंदणी 26 टक्क्यांनी कमी झाली आहे. परंतु, महसूल वाढला आहे. मागील वर्षी याच महिन्यात सरकारने 3 टक्क्यांनी मुद्रांक शुल्क कमी केले होते. त्यामुळे घरांची विक्री चांगली झाली होती.
दरम्यान, कंपनीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2021 मध्ये एका महिन्यात 10 हजार 412 मालमत्तांची नोंदणी झाली होती. जानेवारी 2022 मध्ये नोंदणी झालेल्या घरांमध्ये 52 टक्के घरांची नोंदणी मध्य मुंबई आणि त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरांमध्ये झाली आहे.
नाइट फ्रँक इंडिया कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर व्यवसाय वाढत आहे. ही वाढ थोड्या प्रमाणात असली तरी सकारात्मक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बाजारात अजून चांगली स्थिती पाहायला मिळेल, असे शिसिर बैजल यांनी सांगितले.