लखनौ – उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपला जोरदार धक्के बसले आहेत. त्यानंतर भाजपने देखील समाजवादी पक्षाला जोरदार धक्का देत मुलायमसिंह यादव यांच्या सूनेला भाजपमध्ये घेतलं. मात्र हा डाव आता भाजपवरच उलटणार असं चित्र आहे.
भाजप खासदार रिटा बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी आज सपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सपा प्रवक्ते फखरुल हसन चंद यांनी दावा केला आहे की, समाजवादी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना पक्ष कार्यालयात बोलावण्यात आले असून रिटा बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक आज संध्याकाळी समाजवादी पक्षात प्रवेश करू शकतो.
रिटा बहुगुणा जोशी नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. रिटा बहुगुणा जोशी यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने लखनौ कॅन्टचे तिकीट मागितले आहे. मात्र, या जागेवरून अपर्णा यादव यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते निवडणूक लढवत आहेत. अशा स्थितीत ही जागा भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. याच जागेच्या जोरावर भाजपने अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये घेतलं आहे.
दरम्यान मयंक जोशी यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढविल्यास हा भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकतो. याआधी रिटा बहुगणा जोरा यांनी मी राजीनामा देते पण मुलाला तिकीट द्या, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती.