नायपितॉ – म्यानमारमधील लष्करी बंडाला विरोध करणाऱ्या तब्बल सव्वा लाख शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे, असे म्यानमार टीचर्स फेडरेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर शिक्षकांवर ही कारवाई झाली आहे.
देशभरात सध्या सुरू असलेल्या लष्करी बंडाविरोधी वातावरणाचा परिणाम म्हणून बहुतांश पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतच न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सत्तेवर असलेल्या लष्करी प्रशासनाच्या काळात मुलांना लोकशाहीच्या मूल्यांचे योग्य शिक्षण मिळू शकणार नाही, असा पालकांचा दावा आहे.
दोन वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार म्यानमारमध्ये 4 लाख 30 हजार शालेय शिक्षक होते. त्यापैकी सव्वा लाख शिक्षकांना निलंबित केले गेल्यामुळे शालेय शिक्षणावर मोठा ताण येण्याचीही शक्यता आहे.
सध्या विविध क्षेत्रांमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू व्हावे, यासाठीचा इशारा म्हणून या शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. जर आंदोलनात सहभागी होणाऱ्या या सर्व लोकांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले गेले तर सर्व यंत्रणाच ठप्प होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
या संदर्भात जुंटा म्हणजेच म्यानमारच्या संसदेच्या प्रवक्त्याशी किंवा शिक्षण मंत्रालयाशी संपर्क साधला जाऊ शकला नाही. देशातील शिक्षण व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण संस्थांवरील बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहन सरकारी वृत्तसमूहाने केले आहे.
विद्यापीठातील तब्बल 19,500 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत, असे शिक्षकांच्या गटाने म्हटले आहे. एप्रिलमध्ये म्यानमारमधील यंगून येथे लष्करी बंडाविरोधी निदर्शकांनी मोर्चे काढले. आरोग्य क्षेत्र, सरकारी आणि खासगी व्यवसायांमधील कर्मचारी संपावर गेले असल्यामुळे अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.