निमोणे -करडे (ता. शिरुर) प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऑपरेशन थिएटर मध्ये न नेता दवाखान्याच्या बाहेरच टाके घातल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार (दि. 9) सकाळी 9 वाजता घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
करडे आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचार करण्यासाठी लंघेवाडी, चव्हाणवाडी, तसेच आसपासच्या परीसरातून ग्रामस्थ येत असतात; परंतु लाखो रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णलयात जर वैद्यकीय अधिकारीच रुग्णांना अशी वागणूक देत असतील तर रुग्णांनी नक्की दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
याबाबत बोलताना जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे म्हणाले, झालेला प्रकार चुकीचा असून वैद्यकीय अधिकारी यांना समज देण्यात येईल. करडे गावचे सरपंच सुनील इसवे म्हणाले, याबाबत संपूर्ण माहिती घेऊन पुढील निर्णय घेऊ. वैद्यकीय अधिकारी उज्वला बाभुळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, सकाळी एका पेशंटच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
त्यामुळे काही लोक त्याला घेऊन आले; परंतु त्या वेळेस दवाखान्यात फक्त मी आणि शिपाई होतो. त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यास पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नव्हते. त्यामुळे बाहेरच उपचार करुन डोक्याला झालेल्या जखमेला टाके घातले.