नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यास तिसर्यांदा सुनावण्यात आलेल्या पोेलीस कोठडीची मुदत गुरुवारी (ता. 25) संपत आहे. त्यास पुन्हा पोलीस कोठडी मिळते की? त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बोठे याची पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यास त्याचा ताबा कोतवाली पोलिसांकडे दिला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. बोेठे याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करण्यासाठी बोठेचा ताबा मिळावा, म्हणून कोतवाली पोलिसांनी यापूर्वीच पारनेर येथील न्यायालयात पत्रव्यवहार केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
रेखा जरे हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने पहिले आठ दिवस रेल्वेस्टेशनवर मुक्काम केल्याचे पोलिसांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास व स्पॉटपंचनामा केला आहे. या काळात त्याला कोणी मदत केली? याचा तपास आता पोलीस पथक करत आहे.
रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्याच्या हद्दीत जातेगाव घाटात रात्री पावणे आठच्या सुमारास दोघा जणांनी गळा चिरून हत्या केली होती. पोलीस तपासात या घटनेमागे बाळ बोठे संशयित मुख्य सूत्रधार असल्याचे दुसर्याच दिवशी उघडकीस आले.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र, तेव्हापासून तो फरार झाला होता. त्यात तो हैदराबाद येथे 12 डिसेंबरला पोचल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, तत्पूर्वी तो कोठे राहिला? याबाबत अजुनही उलटसुलट माहिती समोर येत असल्याने पोलीस अजुनही त्याचा कसून शोध घेत आहेत.