गुजरातमध्ये परप्रांतीय कामगारांचा उद्रेक

अहमदाबादमध्ये पोलिसांवर दगडफेक

नवी दिल्ली :  गुजरातमध्ये रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांचा सातत्याने उद्रेक होताना पहायला मिळतो आहे. अहमदाबादमध्ये घरी जाण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या १०० परप्रांतीय कामगारांनी पोलिस आणि रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जमखी झाले असून जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या व लाठीचार्जचा वापर करावा लागला. रस्त्यावर आलेल्या मजुरांना ज्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरच दगडफेक केली. वस्त्रापूर भागात दोन पोलिसांच्या गाड्या, एक खासगी कार्यालय, आणि कन्स्ट्रक्शन साईटची कामगारांनी नासधूस केली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही योग्य ती पावलं उचलली आहेत. अहमदाबादचे पोलिस उप-आयुक्त प्रवीण मल यांनी माहिती दिली.

पोलिसांनी याप्रकरणात कामगारांना ताब्यात घेतलं असून सर्वांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अहमदाबाद शहरातली करोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून, आतापर्यंत ८ हजार ४२० रुग्ण सापडले आहेत. तर ५२४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये गुजरात सरकार व पोलिसांना परप्रांतीय कामगारांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. याआधीही सूरत, वडोदरा शहरात कामगारांनी पोलिसांवर हल्ला व दगडफेक केल्याची घटना घडलेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.