“भारतामध्ये चित्रपटांचे भवितव्य’ ओटीटीमुळे धोक्‍यात ?

पणजी – सध्या निर्माण होणाऱ्या मनोरंजनाच्या स्वरुपाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. हे स्वरुप “भारत’ असे न राहाता “इंडिया’ च्या दिशेने झुकू लागले आहे. असे मत चित्रपट निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांनी व्यक्‍त केले. “इफ्फी’ अंतर्गत “भारतात चित्रपटांचे भवितव्यः संधी आणि आव्हाने’ या विषयावर आज एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या चर्चेच्या परिचालनादरम्यान कपूर यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

सर्व निर्मात्यांनी मोठा फायदा कमावत आपले चित्रपट ओटीटींना विकले आहेत, ओटीटींच्या आगमनामुळे सिंगल स्क्रीन आपले महत्त्व गमावून बसले आहेत, असे मत व्हायकॉम 18 स्टुडियोचे मुख्य परिचालन अधिकारी अजित अंधारे यांनी व्यक्त केले आहे. तर हा मंच दाखल झाल्यापासून ओटीटीवर मनोरंजनविषयक सामग्रीची विक्री खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि ती देखील खूप मोठ्या फायद्याच्या परताव्याच्या बदल्यात होत आहे, विशेषतः कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण खूपच जास्त असल्याचे झी स्टुडियोजचे मुख्य व्यवसाय अधिकारी शारिक पटेल यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर सिंगल स्क्रीन वाचवणे ही आता काळाची गरज बनली असे सीआयआयचे सहअध्यक्ष आणि यूएफओ मुव्हीजचे संयुक्त अध्यक्ष कपिल अग्रवाल यांनी सांगितले. चित्रपट वितरक आणि प्रदर्शक अक्षय राठी यांनी देखील सिंगल स्क्रीनला वाचवणे गरजेचे आहे असे सांगितले.

अलीकडच्या काळात ओटीटीवरील मनोरंजन सामग्रीत आणि दर्शकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ओटीटी मंचावर कथेची मांडणी करताना आपल्याला एका मोठ्या प्रबोधनाचा अनुभव येत आहे, असे अंधारे म्हणाले. घरच्या घरी पाहता येण्याजोगी अधिकाधिक सामग्री ओटीटीवर उपलब्ध होऊ लागल्यामुळे सिंगल स्क्रीन्समधून मिळणाऱा महसूल कमी झाला आहे.

निर्मात्यांना आणि वितरकांना ओटीटीवर कोणताही तोटा सहन करावा लागत नाही. ज्यांनी आपली मनोंरजन विषयक सामग्री ओटीटीवर विकली आहे त्यांना 10 टक्‍क्‍यांपासून अगदी 100 टक्‍क्‍यांपर्यंत नफा मिळाला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ओटीटीवर प्रत्येक चित्रपट यशस्वी ठरत आहे जी बाब निर्मात्यांना भुरळ घालत आहे. कोणतीही स्पर्धा नाही किंवा चित्रपट पडल्याचा शिक्का बसत नाही, असे शारिक पटेल यांनी सांगितले. चित्रपटगृहांमध्ये योग्य प्रकारे ही सामग्री नेणे गरजेचे आहे, महसुलाच्या विभागणीच्या आधारे याची सुरुवात झाली पाहिजे. चित्रपट प्रदर्शन उद्योगाने देखील जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि अधिक पारदर्शक झाले पाहिजे, योग्य दर्शकांसाठी योग्य प्रकारचे मनोरंजन उपलब्ध करण्यावर असे यूएफओ मुव्हीजचे कपिल अग्रवाल यांनी भर दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.