करोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करू नका
पिंपरी – शहरात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करून करोना नियमांचे उल्लंघन करू नये. अन्यथा शहराला लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेऊन करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी मंगळवारी (दि. 16) केले.
करोना प्रतिबंधक लस शहरातील प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यासाठी महापालिकेने नियोजन करावे, अशी सूचनाही महापौर ढोरे यांनी या प्रसंगी महापालिका प्रशासनाला केल्या. शहरात वाढत असलेल्या करोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याचा सर्वंकष आढावा तसेच करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राच्या व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
आयुक्त राजेश पाटील, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती उत्तम केंदळे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अजित पवार, उल्हास जगताप, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, महापालिका रुग्णालयांचे सर्व ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत देण्यात आली. शहरातील मुख्य बाजारपेठा, चौक, भाजी मंडई आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने कडक पावले उचलावीत, असा आदेश महापौर ढोरे यांनी प्रशासनाला दिला.
त्या म्हणाल्या, भरारी पथकाद्वारे तपासणी मोहीम अधिक गतीमान करावी. नागरिकांना लसीकरणासाठी घरापासून दूर जावे लागू नये, यासाठी दाट लोकवस्तीच्या भौगोलिक रचनेनुसार लसीकरण केंद्राची उभारणी करावी.
ढाके म्हणाले, रूग्णवाढ कायम राहिली तर महापालिकेचे नियोजन सर्वंकष असले पाहिजे. शहरातील करोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी कसलीही अडचण भासणार नाही, याची दक्षता महापालिका प्रशासनाने घ्यावी. लसीकरण केंद्रात पुरेसे मनुष्यबळ असावे.
मिसाळ म्हणाले, लसीकरण कामकाजासाठी खासगी रुग्णालयाने पुढाकार घेऊन महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे. त्यासाठी त्यांची यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे.
ऍड. लांडगे म्हणाले, लसीकरण केंद्रासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि आवश्यक सुरक्षा तसेच करोनाविषयक सुविधा पुरवावी. महापालिका रुग्णालये अद्ययावत सुविधांनी सज्ज ठेवावे. नागरिकांना मोफत करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा.
अनावश्यक गर्दी झाल्यास चौकात जमावबंदी
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. लग्न अथवा इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक संख्येने नागरिक जमल्यास आयोजकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले. भरारी पथकांची तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. सूचना देऊनही अनावश्यक गर्दी होत असलेल्या चौक परिसरांमध्ये कलम-144 अनुसार जमावबंदी लागू करावी लागेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरातील रूग्णालयांचा आराखडा तयार
करोना रुग्णवाढीचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. पाटील म्हणाले, करोनाबाधित रूग्ण होम आयसोलेशनला प्राधान्य देत आहेत. “बेड मॅनेजमेंट’ चांगले होण्यासाठी महापालिका प्रशासनाने महापालिका आणि खासगी रुग्णालये यांचा आराखडा तयार केला आहे. महापालिका रूग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा आणि मनुष्यबळ पुरविण्याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. लसीकरण केंद्रांची उभारणी शहरातील विविध भागात केली जात आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केंद्राचे योग्य ठिकाण निवडून तेथे केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.