अन्यथा पवारांनाही पराभव पत्करावा लागला असता : चंद्रकांतदादा

फलटण  – महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असा विजय माढा लोकसभा मतदार संघातील मतदार आणि कार्यकर्त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून दिला आहे. खा. शरद पवार यांना आपली ही जागा राखता आली नाही, ही मोठी नामुष्की आहे. पूर्ण बहुमताने यापूर्वी जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांनी विजयश्री प्राप्त केली होती, त्यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांनाच ते शक्‍य झाल्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारा, देशाच्या सीमा सुरक्षित असल्या पाहिजेत यासाठी यशस्वी प्रयत्न केलेला हाच पंतप्रधान पुन्हा पाहिजे हा सर्वसामान्य मतदारांनी निर्धार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच खा. शरद पवार यांनी या निवडणुकीतून माघार घेतली अन्यथा त्यांना रणजितदादांकडून पराभवाला सामोरे जावे लागले असते, तरीही त्यांना आपला मतदार संघ राखता आला नाही ही खंत असल्याचे ना. चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. माढा लोकसभा मतदार संघातील विजयानंतर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे क्रांतीसिंह नाना पाटील चौक, फलटण येथे उत्साही स्वागत आणि मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी आ. जयकुमार गोरे, दिगंबर आगवणे यांच्यासह अन्य मान्यवर होते. मिरवणुकीत विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गजानन चौकातील जाहीर सभेस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर, करमाळ्याचे आ. नारायणराव पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, माजी आमदार बाबुराव माने, उत्तमराव जानकर, स्वराज संघटनेचे दिगंबर आगवणे, शहाजी बापू देशमुख, श्रीकांत देशमुख, निवृत्त सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले, जयकुमार शिंदे, डॉ. जे.टी.पोळ, नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, अनुप शहा, ऍड. नरसिंह निकम आदी मान्यवरांसह शहर व तालुक्‍यातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, रणजितदादा 27 रोजी दिल्लीत खासदार पदाची शपथ घेणार आहेत.

यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, या मतदार संघातील कोणाचाही अपमान आणि कोणाचीही दहशत यापुढे चालू देणार नाही, असे स्पष्ट करताना आपली ही लढाई रामराजे किंवा अन्य कोणाशी नव्हती, नाही तर आपण नेहमी हत्तीशी झुंज देण्यात समाधान मानले असून यावेळी खा. शरद पवार यांच्याशी आपला लढा होता, असे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

लवकरच नीरा-देवघरचे पाणी लाभक्षेत्रात आणून फलटण, माळशिरस तालुक्‍याला लाभ मिळवून देण्याची ग्वाही देत लोणंद-फलटण-बारामती हा जाणीवपूर्वक रखडवलेला रेल्वे प्रकल्प पूर्ण करुन फलटण ते पंढरपूर या नव्या रेल्वे मार्गाची उभारणी, नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहत आणि अन्य प्रश्‍नांची सोडवणूक करुन माढा मतदार संघातील सामान्यांचे प्रश्‍न यापुढे शिल्लक राहणार नाहीत अशी ग्वाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

रामराजेंवर टीका करताना रणजितसिंह म्हणाले, तुमच्या अनेक गोष्टींची मला माहिती आहे, पुरावेही आहेत मात्र त्याचा उल्लेख आपण कधी केला नाही. लवासा असेल किंवा सगुणामाता आणि शिंदे डेव्हलपर्स कोणाचे? असा सवाल कधी केला नाही, पाटबंधारे प्रकल्पांविषयी कधी बोललो नाही तथापी ही संपूर्ण माहिती मला आहे याची नोंद घ्या आणि विनाकारण टिका टिपणी करु नका त्याचबरोबर हा पुतण्या कसा असा जाहीर सभेत सवाल केलात म्हणून त्याचे उत्तरही कधी दिले नाही, विमानतळ प्रश्‍नी संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे, दाखल केलेल्या खटल्यांबाबत कागदपत्रे आहेत. मात्र त्याबाबतही कधी वाच्यता केली नाही आता सहनशीलता संपली असल्याने तुमच्याबाबतही मला बोलावे लागेल, असा इशारा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला. गेल्या 20/25 वर्षापासून बारामतीकडे गहाण ठेवलेल्या फलटण तालुक्‍याची सुटका करण्याचे काम या निवडणूकीद्वारे झाले आहे.

यावेळी अनुप शहा, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, नगर परिषदेतील विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार बाबुराव माने, उत्तमराव जानकर, आ. नारायणराव पाटील, निवृत्त सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले, श्रीकांत देशमुख, किसनराव देशमुख वगैरेंची समयोचित भाषणे झाली. सभेचे सुत्रसंचालन व समारोप जयकुमार शिंदे यांनी केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.