मनसेचा पालिकेला इशारा; महिलांसाठी पालिकेच्या व्यायामशाळा खुल्या करण्याची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांचे आरोग्य जपण्यासाठी महापालिकेच्या व्यायामशाळांमध्ये महिलांसाठी आधुनिक व्यायामयंत्रणा उभारावी. तसेच महिलांकरिता स्वतंत्र बॅच सुुरु करुन त्याची स्थानिक पातळीवर प्रसिद्धी करावी, अशी मागणी मनसेच्या महिला आघाडीच्या भोसरी विभाग अध्यक्षा सीमा बेलापुरकर यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांना या मागणीचे निवेदन दिले आहे. तसेच महिलांसाठी व्यायामशाळा सुरु न केल्यास पुरुषांच्या व्यायामशाळा बंद करण्याचा इशाराही दिला आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे रोगप्रतिकारक शक्तीचे महत्व सर्वांना समजले.
साधारणत: महिलांमध्ये वयाच्या चाळिशीनंतर उद्भवणारे रक्तदाब, मधुमेह, थायराइड हे आजार भारतातील महिलांमध्ये वयाच्या तिशी-बत्तीशीतच आढळून येत आहेत. प्रत्येक महिलेला स्वत:च्या आरोग्याची निगा राखणे शक्य होत नाही. त्यातच खासगी व्यायामशाळेची भरमसाठ फी आणि महापालिकेच्या व्यायामशाळेत महिलांसाठी असलेला कमी वाव यामुळे शहरातील महिलांचे आरोग्य दिवसेंदिवस ढासळत आहे.
शहरात महापालिकेच्या एकूण 82 व्यायामशाळा आहेत. स्थानिक तरुण मंडळांना भाडेतत्वावर या व्यायामशाळा चालवायला दिल्या आहेत. यापैकी केवळ तीन ते चार व्यायामशाळा महिलांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे महापालिकेने आपल्या व्यायामशाळेत खास महिलांसाठी महिला प्रशिक्षकांची नेमणूक करावी. व्यायामशाळांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बॅच सुरु करुन, स्थानिक पातळीवर याची प्रसिद्धी करावी. तसेच या व्यायामशाळांमध्ये दर्जेदार सुविधा व स्वतंत्र चेंजिंग रुम व शौचालये उभारावीत.
व्यायामशाळांच्या बाबतीत महिलांसोबत दुजाभाव का केला जातो, असा प्रश्न उपस्थित करत 15 दिवसांच्या आत महिलांसाठी व्यायामशाळा खुल्या न केल्यास पुरुष व्यायामशाळांना टाळे ठोकण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आता आहे. या निवेदनावर अनिता पांचाळ, दक्षता क्षीरसागर, सुचित्रा वाघमारे, दुर्गा पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.