“तेथील’ कार्यालये स्थलांतर करण्याचे आदेश 

महात्मा फुले स्मारकात विविध विभागांनी सुरू केले होते कामकाज

पिंपरी – येत्या पाच महिन्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मध्यवर्ती स्मारकातील विविध प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी निविदा राबवावी. ही सर्व कामे पाच महिन्यांत पूर्ण करावीत. तसेच, या स्मारकात स्थलांतर केलेले महापालिकेच्या विविध विभागांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देत, त्या कार्यालयांचे त्याठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिले.

पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई मध्यवर्ती स्मारकाच्या प्रलंबित कामांबाबत महापौर राहुल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीला आयुक्‍त श्रावण हर्डीकर, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, माजी नगरसेवक वसंत लोंढे, सावित्रीबाई फुले स्मारक समितीचे मानव कांबळे, गुलाब पानपाटील, आनंदा कुदळे, प्रताप गुरव, लता रोकडे, हनुमंत माळी, सुनिता शिंदे, सुरेश गायकवाड, शारदा बनसोडे, धम्मराज साळवे, मारुती भापकर आदी उपस्थित होते.

गेली दोन-अडीच वर्षांपासून या स्मारकासाठी समितीच्या वतीने पाठपुरावा सुरु आहे. मात्र, महापालिकेच्या क्रीडा, नगररचना, भूमी जिंदगी विभाग कार्यालयांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याशिवाय स्थापत्य विभागाची कागदपत्रे ठेवण्यासाठी गोदाम म्हणून या इमारतीचा वापर केला जात आहे. तसेच पुण्यातील ब्रिटीश लायब्ररीच्या धर्तीवर या स्मारकात ग्रंथालय विकसित केले जाणार असल्याच्या महापालिकेच्या निर्णयाचा विसर पडल्याची बाब या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणुन दिली. महापौर राहुल जाधव यांनी समिती पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेतल्या. महापालिकेच्या 2019-20 या वर्षीच्या अंदाजपत्रकात या स्मारकासाठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या स्मारकातील नियोजित अभ्यासिका, सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा, स्पर्धा परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन याकरिता वाढीव खर्च होणार आहे. त्याकरिता पाच कोटी रुपये वर्ग केले जाणार आहेत. त्यामधून निविदा प्रक्रिया राबवून, हे काम येत्या पाच महिन्यांत पूर्ण केले जाणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने स्मारकात सुसज्ज ग्रंथालय, दोन दालनांमध्ये सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित दृकश्राव्य प्रदर्शनी विकसित करण्यासाठी सल्लागार नेमणे. तसेच अभ्यासकिा, कौशल्यवृद्धीचे उपक्रम राबविण्याची कार्यवाही येत्या पाच महिन्यांत कार्यवाही करण्याबरोबरच या इमारतीमधील महापालिकेच्या विविध विभागांचे अन्यत्र स्थलांतर करण्याचे लेखी आश्‍वासन आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी समिती पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.