#wari 2019 : 750 मृदुंगांची खरेदी

25 लाखांचा खर्च : प्रत्येक दिंडीला देणार मृदुंग भेट

पिंपरी – आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला भेट देण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांनी अवघ्या दोन दिवसांत 750 मृदुंगांची खरेदी केली आहे. त्याकरिता सुमारे 25 लाख रुपये खर्च आला असून, हा सर्व खर्च नगरसेवकांच्या एका महिन्याच्या मानधनातून करण्यात आला आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी पत्रकारांना सोमवारी (दि.24) दिली.

पंधरा दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयात आषाढीवारी नियोजन आढावा बैठक पार पडली. त्यावेळी संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रमुख मानकऱ्यांनी आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना कोणतीही भेटवस्तू देऊ नये, अशी सूचना मांडली होती.

त्यानंतर नगरसेवकांच्या मानधनातून जमा होणारी रक्कम दुष्काळनिधीला देण्यावर महापालिका पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले होते. त्यामुळे महापालिकेकडून भेटवस्तू देण्याची परंपरा यंदा खंडीत होण्याची शक्‍यता होती. दरम्यान, आज संभाजीनगरमध्ये झालेल्या अनौपचारिक बैठकीत आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला मृदुंग भेट देण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या मृदुंगाच्या एका नगाची किंमत अंदाजे 3300 रुपये असून, असे 750 नग मृदुंग येत्या दोन दिवसांत खरेदी करण्यात आले. आळंदी व पाथर्डीमधून प्रत्येकी 150 नग तर उर्वरित मृदुंगांची खरेदी पंढपरपूरमधून करण्यात आली आहे. महापालिका पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दोन दिवसांत हे सर्व मृदुंग दिंड्यांना भेट दिले जाणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here