लंडन : माणूस दीर्घायुषी कोणत्या प्रकारे होऊ शकतो याबाबत विविध प्रकारचे संशोधन नेहमीच सुरू असते दीर्घकाळ जगणाऱ्या माणसांच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय याबाबत त्यांना नेहमीच प्रश्न विचारले जातात. आता एका नवीन संशोधनाप्रमाणे आशावादी वृत्तीचा माणूस दीर्घकाळ जगू शकतो. सकारात्मक पद्धतीने जिवनशैली आत्मसात करणाऱ्या माणसाला दीर्घायुष्य लाभते असे या महत्त्वपूर्ण संशोधनातून समोर आले आहे.
अमेरिकन वेटरन्स नावाच्या संस्थेने हे संशोधन केले असून त्या संशोधनाची सुरुवात तब्बल 60 वर्षांपूर्वी 1960 च्या दशकात करण्यात आली होती. दीर्घकाळ याबाबत संशोधन सुरू होते आणि आता त्याबाबत निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. या संशोधनामध्ये 223 युवकांचा अभ्यास करण्यात आला. विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये या युवकांची मनस्थिती कशी होती त्यांनी त्या परिस्थितीचा सामना कसा केला याचा अभ्यास या दीर्घ संशोधनात करण्यात आला.
ज्या युवकांनी आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आशादायक आणि सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांना आरोग्याचा कोणताही त्रास झाला नाही असे या संशोधनातून समोर आले आहे. प्रथम 1980 ते 1990 या दहा वर्षांमध्ये या युवकांच्या मानसिकतेचा सर्वे करण्यात आला त्यानंतर 2010 नंतर पुन्हा एकदा सर्व्हे करण्यात आला. या युवकांना एक डायरी देण्यात आली होती या डायरीमध्ये त्यांना सर्व नोंदी करण्यास सांगण्यात आले होते या नोंदीच्या आधारे संशोधकांनी निष्कर्ष काढले असून निष्कर्ष हे जर्नल ऑफ जेरोंटोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
आशावादी लोक दैनंदिन जीवनातील आव्हाने सहजपणे पेलू शकतात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ते निराश किंवा हताश होत नाहीत आणि प्रत्येक समस्येवर तोडगा काढू शकतात असे या संशोधनात म्हटले आहे. जर माणसाला दीर्घायुष्य पाहिजे असेल तर सकारात्मक पद्धतीने आशावाद जोपासला पाहिजे असा सल्लाही या संशोधनात देण्यात आला आहे.