हैदराबाद – तेलंगणातील सत्ताधारी टीआरएस पक्षाचे अध्यक्ष आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे भाजपच्या जनविरोधी धोरणांविरोधातील मोहिमेचा भाग म्हणून 20 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राव यांना फोन करून मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले आहे. ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांच्या भाजप विरोधातील लढ्याला संपूर्ण पाठिंबाही जाहीर केला आहे.
राव यांची भेट घेऊन भाजप विरोधी मोहिमेतल्या भविष्यातील कृतीबाबत चर्चा करू, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली आहे. राव यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून ठाकरे यांनी म्हटले आहे की, विघटनकारी शक्तींपासून देशाचे रक्षण करण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी योग्य वेळी आवाज उठवला आहे.
माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनीही मंगळवारी राव यांना फोन करून त्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे. चंद्रशेखर राव हे ठाकरे यांच्या भेटीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत. भाजपच्या विरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्र आणणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.