डेहराडून – उत्तराखंड मध्ये कॉंग्रेस 48 जागा जिंकणार असल्याचा जो दावा कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी केला आहे त्यावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज जोरदार पलटवार केला. ते म्हणाले की रावत यांना आता दिवसाढवळ्या स्वप्न पडायला लागली आहेत.
पण त्यांची ही स्वप्ने मुंगेरीलाल के हसीन सपने सारखी आहेत. उत्तराखंड मध्ये स्पष्ट बहुमताने भाजपच सत्तेवर येत आहे असा दावाही त्यांनी केला आहे.
काल रावत यांनी राज्यातील मतदारांनी कॉंग्रेसच्या बाजूने स्पष्ट कौल दिला असल्याचा दावा केला होता. भारतीय जनता पक्षाला 20 जागा मिळणार असल्याने भाजपची इभ्रत वाचणार आहे त्याबद्दल मी मुख्यमंत्री धामी यांचे अभिनंदन करू इच्छितो असे विधानही रावत यांनी केले होते.
तथापि रावत यांचा दावा आज धामी यांनी धुडकावून लावला. ते म्हणाले की कॉंग्रेसला या राज्यात संधी मिळण्याची अजिबात शक्यता दिसत नाही.