हडपसर(प्रतिनिधी) :- हडपसर-महमंदवाडी रोडवर सय्यदनगर- ससाणेनगर येथील रेल्वेगेट क्रमांक ७ हे दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीस बंद केले आहे. त्यामुळे येथे वाहतुकीस मोठी गैरसोय होत आहे.तेव्हा रेल्वे प्रसासनाने सय्यदनगर रेल्वेगेट क्रमांक ७ वाहतुकीस खुले करावे, अशी मागणी नगरसेवक मारुतीआबा तुपे यांनी केली आहे.
रेल्वेगेट खुले करावे, असे निवेदन रेल्वेचे अधिकारी विकास कुमार यांना नगरसेवक मारुती तुपे व भाजपा शहर माजी उपाध्यक्ष जीवन जाधव यांनी रेल्वे पुणे कार्यालयात दिले आहे.
रेल्वेगेट क्रमांक ७ वाहतुकीस बंद केल्याने गेटवर दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी होत आहे. पर्यायी मार्ग म्हणून असलेल्या दोन्ही भुयारी मार्गाकडे जाणारे रस्ते अर्धवट असल्याने येथेही वाहतूक कोंडी आणि वाहतूक विस्कळीत होत आहे.
नागरिकांना यासाठी आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे गेट वाहतुकीस सुरू करावे, भविष्यात रेल्वेगेटवर उड्डाणपूल झाल्याशिवाय हे गेट वाहतुकीस बंद करू नये, अशी मागणी या निवेदनाद्वारे नगरसेवक मारुती आबा तुपे व भाजपा शहर माजी उपाध्यक्ष जीवन जाधव यांनी केली आहे.