सिंहगडरस्ता, दि. 14 (प्रतिनिधी) -धायरी गाव-बेनकर मळा येथील स.नं.6,7,8 मधून ओढ्यालगतचा प्रस्तावित 60 डी.पी.रस्ता अद्यापही कागदावरच आहे. याबाबत गेल्या चार-पाच वर्षांत प्रशासकीय अभियंत्यांकडून नकाशांच्या रेघोट्या आखण्यापलिकडे पालिकेकडून कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याने या भागातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे प्रस्तावित रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे धनंजय बेनकर यांनी मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे.
धायरी, बेनकर मळा या भागाचे नागरिकरण गेल्या काही वर्षात मोठ्या वेगाने झाले आहे. याच कारणातून वर्दळही वाढली आहे. त्यामुळे उपलब्ध अरूंद रस्ता वाहतुकीसाठी कमी पडत आहे. सकाळी आणि संध्याकाळी येथे मोठी वाहतूक कोंडी होते. येथे प्रस्तावित रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवून 60 फुटी डीपी रस्ता तातडीने केल्यास येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकते. परंतु, धायरी परिसरात वाहतूक नियोजनाच्या दृष्टीकोणातून पीएमआरडीए तसेच महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. येथील प्रस्तावित रस्त्याचे काम झाल्यास नऱ्हे परिसरात जाणे-येणे सोपे होईल. त्यामुळे ओढ्यालगतचा डीपी रस्त्याचे काम पालिकेने सुरू करावे, अशी मागणी बेनकर यांनी केली आहे.
प्रस्तावित डीपी रस्त्यासाठी भूसंपादन व्हायचे आहे. यासाठी जागा मालकांशी चर्चा करावी लागेल. मालमत्ता विभागाशी समन्वय साधून पुढची कार्यवाही करावी लागेल. निधी पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये प्रस्तावित करून रस्त्याचे काम मार्गी लागू शकते. संबंधित जागामालकांशी लवकरच चर्चा करून मनपा तर्फे नियोजन करण्यात येईल.
– अमर शिंदे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, पुणे मनपा
हा प्रस्तावित 60 फुटाचा ओढ्यालगतचा डीपी रस्ता होणे ही या भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन रस्त्याचा विषय मार्गी लावावा. – गणेश बनकर, माजी सरपंच