फक्‍त साडेतीन हजार खड्डे! महापालिकेच्या पथविभागाचा दावा

पुणे – रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुणेकर हैराण झाले असतानाच महापालिकेने शहरात केवळ साडेतीन हजार खड्डे असल्याचा दावा केला आहे. हे खड्डे “डिफेक्‍ट लायबिलिटी पिरीयड’मध्ये पडले नसल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

ऑगस्टच्या मुख्य सभेच्या कार्यपत्रिकेत नगरसेवक रफीक शेख यांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नांना पथ विभागाने लेखी उत्तर दिले आहे. त्यात 2 महिन्यांत 2 हजार 611 खड्डे बुजविल्याचे नमूद केले आहे. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांत शहरांतील रस्त्यांवर केवळ साडेतीन हजार खड्डे पडल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. खड्ड्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन तक्रार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

महापालिकेकडे 5 हजार 785 तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या. यामध्ये इतर स्वरूपाच्या तक्रारी असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. निविदेतील अटी शर्तीनुसार “डिफेक्‍ट लायबिलिटी पिरीयड’च्या कालावधीत रस्त्यावर खड्डा पडल्यास त्याची दुरुस्ती करून देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. परंतु या रस्त्यांवर कोणत्याही कारणासाठी खोदाई झाल्यास त्याची जबाबदारी ठेकेदारावर नसते. शहरात काम झालेल्या रस्त्यांवर “लायबिलिटी पिरीयड’मध्ये खड्डे पडले नाहीत; त्यामुळे ठेकेदारांकडून त्याची दुरुस्ती करून घेता येणार नाही, असे प्रशासनाने एका प्रश्‍नाला उत्तर दिले आहे. शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. काही ठिकाणी अस्तरीकरण केले गेले. त्यामुळे खड्डे दुरुस्तीची जबाबदारी त्या ठेकेदारावर पडत नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.

5 वर्षांत खड्ड्यांवर 7 कोटी रुपये खर्च
दरवर्षी या पद्धतीमुळे पुणेकरांच्या करातून मिळालेले 2 कोटी रुपये खड्डे दुरुस्तीकरिता खर्ची पडतात. गेल्या 5 वर्षांत सुमारे 7 कोटी रुपये खड्डे दुरुस्त करण्यात खर्ची पडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करूनही शहरांतील रस्ते अद्याप खड्डेमुक्‍त झाले नाहीत. मागील महिन्यातील मुख्य सभेत विरोधी पक्षाने खड्ड्यांच्या विषयात सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. तेव्हा पथ विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. तसेच खड्डे बुजवण्यासंदर्भातील वेळापत्रकही देण्याविषयी आदेश दिले होते. आता पाऊस थांबला असला तरी खड्डे बुजविण्याचे काम संथगतीनेच सुरू असल्याचे चित्र शहरांत दिसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)