सेस फंडाच्या निधीवरून ऋतुजा शिंदे आक्रमक

समान वाटप न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

वाई – वाई पंचायत समितीत राष्ट्रवादी गटाच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्याकडून सेस फंडाची आलेली शासकीय रक्कम बहुमताच्या जोरावर संगनमताने आपआपसात वाटून घेत गेली दोन वर्ष शेंदुरजणे गणातील जनतेच्या हक्काचा शासकीय निधी स्वतःच्या गणात हड़प करून शेंदुरजणे गणाला विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या निषेधार्थ शेंदुरजणे गणाच्या पं.स. सदस्या ऋतुजा शिंदे व कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष विराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गणातील ग्रामस्थांनी वाई पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला. तसेच 2019-2020 च्या बजेट मधील सेस फंडाचे समान फेरवाटप करून शेंदुरजणे गणाच्या हिश्‍य्याचा सेस फंड तात्काळ मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन गट विकास अधिकारी उदय कुसुरकर यांना देण्यात आले.

वाई पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असून शेंदुरजणे गणातून ऋतुजा शिंदे कॉंग्रेस पक्षातून निवडून आल्या आहेत तर बावधन गणातून कॉंग्रेस पक्षातून निवडून आलेले दिपक ननावरे यांनी भाजपचे कमळ हाती धरल्याने राष्ट्रवादीच्या सत्तेपुढे ऋतुजा शिंदे यांची एकाकी लढाई अपुरी पडत आहे. बहुमताच्या जोरावर सत्ताधारी सदस्य सेस फंड व अन्य शासकीय निधीचे वाटप करताना वारंवार मागणी करूनही दुजाभाव करत डावलण्यात येवून कुरघोडीच राजकारण करत शेंदुरजणे गणावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा आरोप ऋतुजा शिंदे यांनी केला आहे.

शेंदुरजणे गणाच्या हक्काचा शासकीय निधीसाठी सभागृहाच्या मासिक बैठकीमध्ये सातत्याने आवाज उठवूनसुद्धा बहुमताच्या जोरावर फक्त सात सदस्या मध्येच सर्व निधी वाटून घेतला जात असल्याने शेंदुरजणे गणातील जनता विकास कामा पासून वंचित रहात आहे. याबाबत गट विकास अधिकारी यांनी लक्ष घालून सर्व सदस्यांना समान निधीचे वाटप करावे अन्यथा सेस फंडाच्या निधुवर कायदेशीर हरकत घेणार असल्याचा इशारा शिंदे यांनी यावेळी दिला. आंदोलनात शेंदुरजणे गणातील बोपर्डी, लोहारे, धावड़ी, बालेघर, मांढरदेव, शेंदुरजणे, मेणवली, वेरुळी, मुंगसेवाडी व परखंदी येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)