…तरच देशात कोरोनेचे संक्रमण थांबेल

लोकांनी घरात थांबणे,वाहतूकीवर कडक निर्बंध लादणे
कोरोना विरोधात लढण्यासाठी तज्ज्ञांनी दिला सल्ला

नवी दिल्ली : कोरोना विषाणूबाधितांची संख्या देशात हळूहळू वाढू लागली आहे. रविवारपर्यंत 107 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. पण या आजाराविरोधात लढण्यासाठी आणि त्याचा फैलाव रोखण्यासाठी भारताकडे एकमेव कडक उपाय असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. लोकांना कोणत्याही परिस्थितीत घरात थांबण्यासाठी निर्देश देणे, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या वाहतुकीवर आणि सार्वजनिक ठिकाणांवर कडक निर्बंध लादणे, ही ठिकाणं तात्पुरती बंद करणे, या दोन्ही गोष्टी काटेकोरपणे केल्यास भारतात कोरोना विषाणूचे संक्रमण होण्यापासून रोखण्यात येवू शकते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत रविवारी मोठी वाढ झाली. हा आकडा देशात 107 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोना विषाणू बाधित 33 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे-पिंपरीमध्ये सर्वाधिक 16 रुग्ण आहेत.

कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे स्पेनमध्ये रविवारी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली. लोकांनी कोणत्याही स्थितीत आपल्या घरातून बाहेर पडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. स्पेनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 100 हून अधिक नागरिक मृत पावले असून, रविवारी 2000 नव्या नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले.

फ्रान्समध्ये सर्व सार्वजनिक व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. इटलीमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अमेरिकेनेही कोरोना विषाणूच्या धोक्‍यामुळे देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.