सोरतापवाडी -सोरतापवाडी (खोरावडे वस्ती) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या दीड महिन्यांपासून पहिली ते चौथीसाठी फक्त एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे शिक्षणाचा बट्टयाबोळ झाला आहे. दरम्यान, दि. 15 ऑगस्टपूर्वी शाळेत शिक्षक नेमला नाही तर दि. 16 रोजी ग्रामस्थांच्या वतीने शाळेला कुलूप लावण्यात येईल, असा इशारा भाजप सोशल मीडिया सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य चौधरी यांनी दिला आहे.
शाळेची पटसंख्या 80 च्या आसपास आहे. 3 शिक्षकांची गरज असताना जिल्हा परिषदेच्या वतीने एकच शिक्षक कामावर हजर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक नाही म्हणून शाळेच्या दुरवस्थेपासून आधीच बदनाम असलेल्या शाळेत आता विद्यार्थी असताना शिक्षकच नसल्याचे विदारक चित्र आहे. ही सधन हवेली तालुक्यातील शिक्षणाबाबत शोकांतिका आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाची उदासीनता दिसत आहे. दरम्यान, रवींद्र चौधरी, प्रवीण चौधरी, संतोष बाबर, सुरेश बडधे, मनोज चौधरी, महेंद्र चौधरी, इंद्रभान बाबर, संतोष चौधरी, पदाधिकारी उपस्थित होते.
खोरावडे वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत लवकरच शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल.
-रामदास वालझडे, गटशिक्षणाधिकारी, हवेली.