भारताकडून देण्यात येणारी मिठाई घेण्यास पाक सैन्याचा नकार

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे झाले आहेत. त्यातच आज देशभरात उत्साहात साजरी होणारी बकरी ईद सीमेवरही साजरी करण्यात आली. मात्र, यावेळी भारताकडून पाकिस्तानला मिठाई पाठवण्याचा प्रस्ताव त्यांच्या सैन्याकडून धुडकावून लावला आहे. दोन्ही देशात मोठ्या सणांच्यावेळी एकमेकांना मिठाई देण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. परंतु, काश्‍मीरच्या बाबतीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे यंदा पाकिस्तानच्या सैन्याने मिठाई घेण्यास नकार दिला आहे.

हुसैनीवाला बॉर्डरवर बॉर्डर सिक्‍युरिटी फोर्सच्या जवानांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही पाकिस्तानच्या सैन्याला ईदच्या निमित्ताने मिठाई पाठवण्याचा प्रस्ताव दिला मात्र पाकिस्तानच्या सैन्याकडून त्यासाठी नकार आला आहे. भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ जवानांकडून पाकिस्तानी सैन्याला मिठाई देण्याचा कार्यक्रम केला गेला. मात्र सध्या दोन्ही देशांमधील तणाव इतका वाढला आहे की, पाकिस्तानी सैन्याकडून भारताच्या मिठाईला नकार देण्यात आला. पाकिस्तानकडून बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अटारी-वाघा बॉर्डर आणि हुसैनीवाला बॉर्डरवर मिठाई देण्या-घेण्यासाठी कोणताही संदेश आला नाही. याआधी पाकिस्तानकडून संदेश प्राप्त झाल्यानंतर भारताकडून मिठाई दिली जात होती. मात्र यंदा असे झाले नसल्याचे बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.