राजगुरूनगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात “ऑनलाइन टिचिंग’ प्रभावी भूमिका बजावत असून, संस्थेच्या या उपक्रमास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर यांनी दिली. 26 मेपासून संस्थेच्या तीनही विभागात ऑनलाइन पद्धतीने अध्यापन सुरू करण्यात आले आहे.
महात्मा गांधी विद्यालय व केटीईएस इंग्रजी माध्यम विद्यालय या दोन विभागांत दहावीसाठी, तर महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून झूम ऍपद्वारे सर्व विषयांचे ऑनलाइन अध्यापन सुरू करण्यात आले आहे. अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या अद्ययावत सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिल्या असून 75 टक्के विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्याची ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहे. हे टिचिंग हे मोफत व नि:शुल्क आहे.
विद्यालयांत ग्रामीण भागातून येणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या गावामध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नाही अशा पालकांशी विद्यालयाचे प्रमुख संवाद साधतात आणि त्यांच्या समस्या निराकरण करण्यासाठी शाळा व संस्था स्तरावर प्रयत्न केले जातात, अशी माहिती शाळा समिती अध्यक्ष प्रा. पांडुरंग होले यांनी दिली. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, सचिव एअर कंमाडर गणेश जोशी, शाळा समिती अध्यक्ष प्रा. पांडुरंग होले, डॉ. प्रदीप शेवाळे, संचालक गणेश घुमटकर प्रयत्नशील आहेत.