चिंबळी- पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा ते चाकण प्रवास करत असाल तर सावधान. कारण आता याठिकाणी तिसऱ्या डोळ्याची नजर तुमच्यावर असून तुम्ही नियम मोडल्यावर तुम्ही त्यात कैद होताच व तुमच्या मोबाइलवर नियम मोडल्याचा व दंडाच्या रकमेचा संदेश येतो. आळंदी-दिघी वाहतूक विभागाच्या या गांधीगिरीमुळे आधीच वाहतूककोंडीमुळे “घायकुतीला’ आलेल्या वाहनचलकांना आता ऑनलाइन दंडाचा “शॉक’च बसत असल्याचे नियमित वाहनचालकांनी स्पष्ट केले.
पुणे-नाशिक महामार्ग म्हणजे वाहतूककोंडी अन् यमराजाचे दार अशी ओळख आहे. या महामार्गावर दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून पोलिसांसह वाहनचालकांचे आपपासात वाद-विवाद होताताच. त्यामुळे वाद उद्भवू नये यासाठी पोलिसांचे सध्या ऑनलाइन दंडाचे काम जोमात सुरू आहे; मात्र वाहनचालक या त्रासाला कंटाळले असून पोलिसांची ही गांधीगिरी त्यांना जुलूमशाही वाटू लागली आहे.दर चार ते पाच दिवसाला दंड पडत असल्याने गाड्या हाकायच्या तरी कशा असा प्रश्न त्यांना पडला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर आधीच वाहतूकव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत त्यातून वाट काढत प्रवास करायचा म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यातच भरीस भर की काय वाहतूक पोलिसांना मिळालेल्या मशीनचा वापर एटीएम सारखा केला जात असून झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी असल्यास, नो पार्किंग बोर्ड नसला तरी नो पार्किंगच्या जागी गाडी उभी असल्यास तात्काळ गाडीचा फोटो काढला जात असून ऑनलाइन दंड टाकला जात असून याची गाडी चालकाला खबर देखील नसते.
वाहनचालकांचे असे म्हणणे आहे की तुम्ही ऑनलाइन दंड जरूर घ्या; परंतु त्या ठिकाणी संबंधित नियम दर्शवणार फलक आहे का? तो विनाकारण थांबला आहे, की काही अडचण आली म्हणून तो थांबला आहे का? आदींची शहानिशा न करता थेट दंड आकारला जात असल्याने वाहनचालक वैतागले असून वाहतूक सुरूळीत जरुर करा मात्र विनाकारण कोणत्याही वाहनचालकास बळीचा बकरा बनवू नका, एवढी माफक अपेक्षा चालकांसह प्रवाशांनी केली आहे.
नो पार्किंगचा बोर्ड नाही तरी…
पुणे-नाशिक महामार्गावर महाले कंपनी जवळच्या गणपती चौकात चाकण वाहतूक विभागाचे पोलीस तैनात असतात या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी असते. यावेळी सिग्नलचे नियम मोडले जाण्याचे प्रकार नित्यानेच घडतात; मात्र ते का मोडले गेले याची सहानिशा न करता ऑनलाइन दंड पडत असून विशेषतः चारचाकी वाहनेच यात सर्वाधिक सापडत आहेत. चाकण, मरकळ आदी चौकात वाहतूक विभागाचा “नो पार्किंग’ असा एकही फलक दिसत नाही; मात्र तरीही या ठिकाणी गाडी उभी केली गेल्यास दंड पडत असल्यने पहिले सुविधा उपलब्ध करा मग पुन्हा खुशाल दंड वसूल करा अशी माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.