पात्र 2 लाख 16 हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड : शासनस्तरावर होणार छाननी
नगर – महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी बॅंक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सोमवारपर्यंत 3 लाख 8 हजार शेतकऱ्यांचे रेकॉर्ड याद्या शासनाच्या “पोर्टलवर’ अपलोड करण्यात आल्या. अर्थात 2 लाख 16 हजार 427 शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या नावावर दोन वेळा कर्ज घेतल्याच्या नोंदी असल्याने 3 लाख 9 हजार 71 असे शेतकऱ्यांचे रेकॉर्ड झाले असून त्यापैकी 3 लाख 8 हजार शेतकऱ्यांचे याद्या अपलोड झाल्या आहेत.
आता केवळ 500 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होणे बाकी असून तेही लवकरच पूर्ण होणार आहे. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गेल्या 1 एप्रिल 2015 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील थकबाकीदार 2 लाख 16 हजार 427 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंका, ग्रामीण बॅंक, व्यापारी बॅंका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.
कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी “लिंक’ करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी बॅंक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी “लिंक’ करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड’ करण्याची प्रक्रिया 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे.
सोमवार, 4 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र 2 हजार 16 हजार शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड ‘ करण्यात आल्या असून, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, राष्ट्रीयीकृत बॅंका, ग्रामीण बॅंक व व्यापारी बॅंकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. याद्या अपलोड झाल्यानंतर शासनस्तरावर पात्र शेतकऱ्यांची छाननी केली जाणार आहे. त्यातून नोकरदार, 25 हजारपेक्षा जास्त पगार, आमदार, खासदार आदी वगळले जाणार असून त्यातून पात्र शेतकऱ्यांची निवड करून त्यांची कर्जमुक्ती होणार आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात नगर जिल्हा आघाडीवर आहे.
दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिंबधक