पुणे – महापालिकेच्या स्थायी समितीचे अंदाजपत्रक दि.24 किंवा 25 फेब्रुवारीला सादर केले जाण्याची शक्यता आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी या दोन तारखा निश्चित केल्या असून, प्रशासनाने त्यासाठी ते नियोजन सुरू केले आहे. आयुक्त शेखर गायकवाड यांनी दि.27 जानेवारीला अंदाजपत्रक सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून समितीच्या बैठका सुरू आहेत.
आयुक्त गायकवाड यांनी 2020-21 या आर्थिक वर्षाचे सुमारे 6 हजार 229 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले आहे. त्यानंतर आता त्यावर चर्चा सुरू आहे. त्यातच आयुक्तांनी अंदाजपत्रकात सुचवलेली सुमारे 12 टक्के मिळकतकरवाढही स्थायी समिती अध्यक्षांनी रद्द केली आहे. त्यामुळे आयुक्तांचा अंदाज सुमारे दीडशे कोटींनी गडगडला असताना, स्थायी समिती हे उत्पन्न कसे भरून काढणार याकडे लक्ष आहे.
रासने यांनी पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी महसूलवाढ समिती नेमली आहे. मागील अध्यक्षांनी सुमारे 6 हजार 762 कोटींचे अंदाजपत्रक मांडलेले आहे. स्थायी समिती अध्यक्ष सात हजार कोटींचा टप्पा ओलांडणार का, हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.