नांदेड – नांदेड शहरातील वाजीराबाद येथील बॅंकेत 14 कोटी रुपयाचा ऑनलाइन दरोडा टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दरोड्यात हॅकरने आयडीबीआय बॅंकेतील शंकर नागरी बॅंकेच्या खात्यातील तब्बल 14 कोटीच्या रकमेवर आरटीजीएसद्वारे डल्ला मारला आहे.
या प्रकारामुळे जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर बॅंकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बॅंकेत अनेक नावाने खाते उघडून खात्यातील 5 लाखाच्या आतील रक्कम काढली. महत्वाचे म्हणजे सर्व रक्कम ही आरटीजीएस आणि एनईएफटीने काढली गेल्याची माहिती समोर येत आहे.
या विषयी शंकर नागरी बॅंकेचे सीईओ व्ही.डी. राजे म्हणाले, हॅकरने बॅंकेच्या खात्यातील 14 कोटी रुपये आरटीजीएस आणि एनईएफटीच्या माध्यमातून आपल्या खात्यावर वळवले. परंतु ज्या बॅंकेत एवढा मोठा ऑनलाइन दरोडा पडला.
त्या विषयी आयडीबीआय बॅंकेचे शाखा व्यवस्थापक रुपेश कोडगिरे यांनी मात्र काहीही बोलण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात शिवाजीनगर पोलिसात शंकर नागरी बॅंकेकडून लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.