मुंबई -जागतिक क्रिकेटमध्ये दोन प्रकारचे फलंदाज असतात एक सचिन तेंडुलकर तर बाकी इतर. त्यामुळे विराट कोहलीच नव्हे तर सचिनशी कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, अशा परखड शब्दांत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने या सर्व चर्चा निरर्थक असल्याचे सांगितले आहे.
गेली अनेक वर्षे मी सचिनशी अमुकतमुक फलंदाजाशी तुलना होताना पाहिली आहे. ब्रायन लारा, इंझमाम उल हक, ग्रॅहम हिकपासून ते आताच्या ज्यो रूट, विराट कोहली यांचीही सचिनशी तुलना केली जाते. खरे तर सचिन ज्या प्रकारचा खेळाडू आहे, ते पाहता त्याची कोणाशीही बरोबरी किंवा तुलना होऊ शकत नाही. तांत्रिकदृष्टीने पाहिले तर तो जगातील आतापर्यंतच्या बहुतेक सगळ्याच फलंदाजांपेक्षा जास्त चांगला प्रगल्भ आहे.
सचिनकडे प्रत्येक गोलंदाजासाठी योजना तयार असते व गोलंदाजाच्या प्रत्येक चेंडूवर त्याच्याकडे उत्तर असते, हा गुण मी अन्य कोणत्याही फलंदाजात पाहिला नाही, असे पॉंन्टिंग म्हणाला.
जर तुलना करायचीच असेल व कोहली ग्रेट की सचिन यावर चर्चा करायची असेल तर कोहली ज्या दिवशी निवृत्त होईल त्यावेळी यावर बोलू. मात्र, कोहलीच नव्हे तर सचिन एकमेवाद्वितीय आहे. तंत्राच्या बाबतीत सचिन हा मी पाहिलेला किंवा त्याच्या विरुद्ध खेळलेला सर्वोत्तम फलंदाज आहे, असेही त्याने सांगितले.