राजगुरूनगर -चाकण येथे शनिवार (दि.6) आंबेठाण चौकात राहणाऱ्या व्यक्तीचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
चाकण नगर परिषदेच्या हद्दीतील हा पहिला करोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. खेड तालुक्यात आतापर्यंत 28 करोनाबाधित रुग्णाची संख्या होती. त्यापैकी पाचजण उपचारानंतर घरी आले आहेत. एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
उर्वरित 22 रुग्णांवर पुणे येथे उपचार सुररू आहेत. तालुक्यात आठ दिवस एकही संशयित रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे तालुक्याने मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली असतानाच चाकण नगर परिषद हद्दीत आंबेठाण चौकात एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. हा रुग्ण चाकण शहरात फिरला असल्याचे समजते.
त्यामुळे चाकणकर भीतीच्या छायेत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून शोध सुरू आहे. प्रशासनाकडून खबरदारीची उपाययोजना आखण्यात येत आहे.