११ नवे संशयित विलगीकरण कक्षत दाखल
सातारा (प्रतिनिधी) : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी एकाचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने जिल्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या चार झाली आहे. तसेच जिल्ह्यातील विलगीकरण कक्षात ११ नवे संशयित दाखल झाले आहेत.
काल 4 एप्रिल रोजी करोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांपैकी एका ५४ वर्षीय पुरुष नागरिकाचा करोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. याचबरोबर ३१ वर्षीय युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा अहवाल पुण्यातील एन.आय.व्ही. संस्थेने कळविले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण चार झाली असून आज सातारा येथे चार व कराड येथे सात संशयित नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
चौथा करोना बाधित रुग्ण सातारच्या ग्रामीण भागातील असून वाळकेश्वर (मुंबई) येथे मागील १४ वर्षापासून खासगी कारचालक म्हणून एकटा राहत होता. तो ८ मार्च रोजी टेम्पोने गावी आला. दोन दिवसांपूर्वी ताप व सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यास मधुमेहाचा त्रास असून त्यावर उपचार चालू आहेत. सद्यस्थितीत त्याची प्रकृती स्थिर असून त्यावर मार्गदर्शक सूचनांनुसार करोना संसर्गाचे उपचार चालू आहेत. या करोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व निकट सहवासातील लोकांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार मरकज काळात दिल्ली येथे भेट दिल्याने सातारा जिल्ह्यातील २५ ते २७ वयोगटातील चार पुरुषांना रविवारी कोविड- 19 संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये १ ते ८५ वयोगटातील ५ पुरुष व १ महिला अशा ६ नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले अआहे. यातील ३० वर्षाचा पुरुष करोना बाधित रुग्णांचा निकट सहवासित असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच परदेश प्रवास करुन आलेल्या एका ६७ वर्षीय पुरुषास देखील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. या सर्व 11 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्याला एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात येत असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सध्या विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या दोन करोना बाधित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने 14 दिवस पूर्ण झाल्याने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.