शहराबाहेरील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह : एकूण रुग्णसंख्या 124
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “वायसीएम’ रुग्णालयात दाखल असलेल्या तीन रुग्णांना “करोना’ची लागण झाली असल्याचे सष्ट झाले आहे. त्यापैकी शहरातील चऱ्होली येथील एक रुग्ण असून इतर दोन रुग्ण हे पुण्यातील बोपोडी आणि ताडीवाला रोड परिसरातील आहेत. यामुळे शहरातील आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 124 झाली आहे. त्यातच दिलासादायक बातमी म्हणजे शहरातील दोन रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत.
“वायसीएम’मध्ये “करोना’वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 55 इतकी आहे. तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्याही 55 आहे. शहरातील रहिवासी परंतु शहराबाहेर घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11 असल्याने शहरातील एकूण 66 रुग्ण “करोना’वर उपचार घेत आहेत. करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये शहरातील एका पुरुष व शहराबाहेरील एक पुरुष व एका स्त्रीचा समावेश आहे.
रविवारी 98 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी दोन रुग्ण हे बोपोडी व ताडीवाला रोड पुणे येथील रहिवाशी आहे. त्यात एक 32 वर्षांचा पुरुष आणि एक 49 वर्षांची स्त्री आहे. तसेच शहरातील चऱ्होली येथील 32 वर्षीय एका पुरुषांला करोनाची लागण झाली. कासारवाडी व खराळवाडी येथील दोन रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आणखी दोन परिसर सील
चऱ्होली येथील चऱ्होली बुद्रुक रोड, हायस्कूल रोड, हिंदवी एंटरप्रायजेस, रोहन झेरॉक्स सेंटर हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच पिंपळे गुरव येथील भक्ती दर्शन सोसायटी, पुष्पांजली अपार्टमेंट, पाण्याची टाकी, काटेपूरम चौक, कृष्णा चौक, अखिल क्रांती चौक, एम.के.चौक, शिंदेशाही हॉटेल हा परिसर सील केला आहे.