मुंबई – अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन येत्या ५ ऑगस्टला होत आहे. अशातच शिवसेनेतर्फे राममंदिर उभारणीसाठी एक कोटी रुपयांचा निधी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलाय. याबाबतची माहिती देताना शिवसेनेतर्फे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत केलेल्या घोषणेनुसार हा निधी देण्यात आल्याचं म्हटलंय.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मुख्यमंत्रीपदावर विराजमान होऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने अयोध्या दौरा केला होता. यावेळी त्यांनी राममंदिर उभारणीसाठी शिवसेनेकडून ट्रस्टला १ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी घोषणा केली होती.
मात्र काही दिवसांपूर्वी ट्रस्टचे सदस्य महंत नृत्य गोपाळ दास यांनी, उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दानुसार राम मंदिर उभारणीसाठी कोणताही निधी दिला नसल्याचा दावा केला होता.
याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेतर्फे आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून राममंदिर उभारणीसाथीच्या निधीबाबत ट्विट करण्यात आले. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला लिहिलेले पत्र जोडण्यात आले असून दिनांक २७ जुलै रोजी राम मंदिर उभारणीसाठीचा निधी आरटीजीएसद्वारे ट्रस्टच्या खात्यावर जमा करण्यात आल्याचं सांगितलंय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्या यात्रेदरम्यान राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी रुपयांचे योगदान करण्याचा संकल्प केला होता, त्याप्रमाणे २७ जुलैला राम मंदिरासाठी ₹ १ कोटींची देणगी श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे RTGS द्वारे जमा करण्यात आली आहे. pic.twitter.com/mfF7vEzc9L
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 3, 2020