जिल्हा प्रशासन सुविधा पुरविण्यास तयार
पुणे(प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा येत्या 13 सप्टेंबरला होत आहे. यासाठी पुण्यातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्याही तुलनेने जास्त आहे. करोना प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यात परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांची निवासाची व्यवस्था व्हावी, अशी मागणी होत आहे.
पूर्व परीक्षेसाठी आयोगाकडून योग्य ती खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात येत आहे. पुणे शहरात राज्यभरातील असंख्य उमेदवार या परीक्षेसाठी तयारी करतात. करोनाच्या संकट काळात या विद्यार्थ्यांना आपले राहते घर, खोली, वसतिगृह सोडावे लागले आहे. त्यामुळे त्यांना परीक्षा देण्यासाठी शहरात आल्यानंतर निवास व्यवस्थेची मोठी अडचण येणार आहे. करोनामुळे उमेदवारांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
एमपीएससीची पूर्व परीक्षा पुण्यातही होत आहे. या परीक्षेसाठी बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना निवासाची व्यवस्था करावी, असे निवेदन प्राप्त झाले आहे. एमपीएससीच्या परीक्षेसाठी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते सोई-सुविधा पुरविण्यात येणार आहे.
– सौरभ राव, विभागीय आयुक्त
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले आहे. स्पर्धा परीक्षा उमेदवारांची करोनाच्या संकट काळात होणाऱ्या अडचणीकडे लक्ष वेधले आणि परीक्षार्थी उमेदवारांची प्रशासनाकडून निवासाची व्यवस्था व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.