सातारा – देगाव (ता. सातारा) येथील रहिवाशी व जिल्हा बॅंकेच्या संचालिका कांचन सतीश साळुंखे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी एक लाख 60 हजार रूपये किंमतीचे साहित्य लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, जिल्हा बॅंकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांचे देगाव येथे घर आहे. त्या घराच्याशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधकामासाठी लागणारे साहित्य ठेवले होते. त्यातील वेल्डींगसाठी आणलेले दोन ऑक्सिजन सिलेंडर, लोखंडी अँगल व पाईप, पाण्यातील तीन इलेक्ट्रीक मोटारी, लोखंडी प्लेट, काटेरी तारेचे बंडल असा एक लाख 60 हजार रूपयांचे साहित्य चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार पिसाळ करत आहेत.