पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक कधी होणार याबाबत संभ्रम आहे. मात्र निवडणूक विभागाकडून मतदार याद्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यापूर्वी मतदार नोंदणीमध्ये बोगस व दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि भोर विधानसभा मतदारसंघातील एकूण 5 हजार 87 मतदारांची नावे वगळण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीबाबत सद्यस्थितीत संभ्रम आहे. मात्र, पुढील काही महिन्यात कधीही ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अडीच वर्षानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेची सार्वत्रिक निववडणूक होत आहे. त्यासाठी मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. मतदार नोंदणी अभियानाव्दारे स्थलांतरित, दुबार, मयत, बोगस मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही केली जाते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील चारही विधासभा मतदारसंघातील एकूण 5 हजार 87 मतदारांची नावे वगळण्यात आली. यामध्ये पिंपरी विधानसभा 993, चिंचवड विधानसभा 1 हजार 583, भोसरी विधानसभा 2 हजार 453 आणि भोर विधानसभा 58 मतदारांची नावे वगळण्यात आली आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणूक कधी होईल हे न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीला कधीही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून तयारी सुरू आहे. तीन सदस्यीय प्रभागानुसार मतदार याद्यांचे विभाजन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मतदारनोंदणी अभियानानंतर भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण मतदारसंख्या 14 लाख 41 हजार 55 मतदारसंख्या आहे. त्यामध्ये पुरुष मतदार 6 लाख 97 हजार 34 आहेत. तर महिला मतदार 6 लाख 3 हजार 525 आहेत. सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील मतदारांची संख्या 13 लाख 16 हजार 836 इतकी होती. अडीच वर्षात मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि भोर विधानसभेत मिळून एकूण 1 लाख 40 हजार मतदार वाढले आहेत.