दोघांना अटक; यवत पोलिसांची कारवाई
यवत- दौंड तालुक्यातील देलवडी गावच्या हद्दीत अवैधपणे कारमधून दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना यवत पोलिसांनी गुरुवारी (दि. 5) अटक केली आहे. यामध्ये 27 हजार 270 रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा व कार असा 1 लाख 69 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रणधीर मधुकर पवार (वय 27, रा. इंदिरानगर, यवत, ता. दौंड) आणि खंडेराव राजेंद्र यरकळवाड (वय 20, रा. केडगाव, ता. दौंड) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस हवालदार संतोष पंडीत व पोलीस नाईक दशरथ बनसोडे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना दोघेजण काळ्या रंगाच्या कारमधून बेकायदा देशी-विदेशी दारू एकेरीवाडी ते देलवडी रोडने पिंपळगाव येथे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस संतोष पंडीत, दशरथ बनसोडे आणि होमगार्ड नवनाथ वेताळ यांनी सापळा रचून गुरुवारी सायंकाळी कार देलवडी गावच्या हद्दीत पकडली.
तपासणी केली असता कारमध्ये ऑफिसर चॉईस, टॅगोपंच, इम्पीपीरियल ब्लू, ब्लॅंडर स्पाईट, रॉयल स्टॉंग, ग्रॅंड मास्टर वोडका, रॉयल चॅलेंजर व्हिस्की, मॅंगडॉंल नंबर 1 व्हिस्की, मॅंगडॉंल रॉयल नंबर 1 लगझरी, गोवा जीन कंपनी आदी कंपनीचा दारूचा साठा मिळाला. पोलिसांनी दारूचा साठा जप्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक दशरथ बनसोडे करीत आहेत.