ग्रामस्थांनी मागणी करूनही उपाय नाहीत
वेल्हे- वेल्हे तालुक्यातील वनविभागात अधिकारी व कर्मचारी गस्त घालत आहेत. विशेष म्हणजे त्यांनाही दिवसा गस्त घालताना बिबट्याचे दर्शन होत आहे. परंतु, मागणी करूनही पिंजरा लावण्याकडे अधिकाऱ्यांचे दर्लक्ष होत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वेल्हे तालुक्यातील पानशेत खोऱ्याच्या पश्चिम भागातील चांदसड धनगरवस्ती, कुर्तवडी, गोंडेखल, टेकपोळे, टाकी धनगरवस्ती, फरताड वस्ती, दापसरे, रेडेखिंड, धनगर वस्ती परिसरात बिबट्याच्या वावर असल्याने नागरिकांत भिती वाढली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याने बिबट्या अगदी सहजपणे सर्वत्र वावरताना दिसत आहे. टेकपवळे, कुर्तवडी गावाच्या हद्दीत सोनाबाई विठ्ठल मोरे ह्या जनावरे चारत असताना बिबट्या गुरांवर धाऊन आला. सोनाबाई मोरे यांनी आरडाओरडा करीत आपल्या हातातील काठीचा धाक दाखवत जीव वाचवीत गुरांना घेवून कशातरी निसटल्या.
मधुकर नाकत्ती हे कुर्तवडी (ता.वेल्हे) गावातून पायवाटेने टेकपवळे येथे येत असताना त्यांच्या समोरा बिबट्या आला. नाकत्ती यांच्या दिशेने धाव घेणार इतक्यात नाकत्ती यांनी आरडाओरडा करीत तेथून पळ काढला. तसेच, टेकपवळे गावात रात्रीच्या सुमारास बिबट्या घरा जवळ येऊन कुत्र्याची शिकार करून गेला. बिबट्याच्या अशा बिनधास्तपणे वावरण्याने वेल्हे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले झाले असून नागरिक बिबट्याची धास्ती घेवू लागले आहेत.
- टेकपवळे, कुर्तवडी गावातील लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. काही अनूचित घटना घडण्यापूर्वी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे आहे.
– संपत मोरे,मनसे प्रमुख - वेल्हेत जंगलाचे प्रमाण मोठे असल्याने बिबट्याचा वावर मोठा आहे. नागरिकांनी जनावरे चारताना व एकटे फिरताना काळजी घ्यावी, मोठा आवाज येणारीय यंत्रे, काठी जवळ बाळगावी.
– निरडे, वनरक्षक, पानशेत