पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकळला आहे. स्पर्श हॉस्पिटलच्या नावावर गेली अनेक दिवस गोंधळ सुरू आहे. याची एकदाची लाचलुचपत खात्याकडून चौकशी होऊन जाऊ द्या, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी सर्वसाधारण सभेमध्ये केली.
स्पर्श हॉस्पिटलला देण्यात आलेल्या सव्वा तीन कोटी रुपयांच्या बिलावरून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, स्पर्श रुग्णालयाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. स्पर्श हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या नावाने करारनामा होणे अपेक्षित होते. मात्र करारनामा वेगळ्याच नावाने आहे. या पालिकेत अनेकांचे हितसंबंध आहे. याची एकदाच काय ते लाच लुचपत प्रतिबंधक (अँटी करप्शन ब्युरो) विभागाच्या वतीने चौकशी होऊन जाऊ द्या. त्यामध्ये ज्या कोणत्या पक्षाचे नगरसेवक असतील ते बाहेर येईल. स्पर्शमध्ये ज्या छोट्या एजन्सी सहभागी आहेत त्यांची नावे उघडकीस आणण्याची गरज आहे.
प्रशासनानेही सगळा भोंगळ कारभार चालवला आहे. त्यांना जशा वाटतील तशाच अटी-शर्ती टाकत आहेत. जेणेकरून त्यांना त्यांच्या मनासारखे करून घेता येईल. इकडे आमच्यावर कोणी काहीही आरोप करत आहे. ज्या लोकांचे ठेकेदारांशी हितसंबंध आहे, ज्यांना आम्ही रेड हॅंड पकडले आहे, ते ही आता बोलत आहेज. करोनाच्या काळात आम्ही फिल्डवर नागरिकांच्या मदतीसाठी धावत होतो.
तर बाकीचे आपलाच ठेकेदार कसा निविदेत बसेल यासाठी प्रयत्न करत होते. इथल्या नगरसेवकांमध्ये स्पर्धा लागली आहे. आपल्याला काम मिळाले नाही की दुसऱ्याचे उकरून काढण्याचे प्रकार सुरू झाले असून त्याचीही चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही सावळे यांनी यावेळी केली.
एखाद्या आपल्या वाट्याला गेला तर त्याचेही काहीतरी उकरून काढायचे. स्पर्शमध्ये जौ काय भ्रष्टाचार झाला आहे, त्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी सावळे यांनी यावेळी केली.