पाचगणी – काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी (गट अ संवर्ग) म्हणून जिल्हा यवतमाळ येथे महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची बदली झाली होती. पल्लवी पाटील मागीत दिड वर्षापासून महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या. महाबळेश्वरमध्ये त्यांनी अनेक विकासकामांना चालना दिली. धडाडीच्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. मात्र त्यांची बदली झाल्याने महाबळेश्वरकर चिंतीत होते. आता नवीन अधिकारी कोण येणार हा सर्वांनाच प्रश्न पडला होता मात्र पुन्हा एकदा पल्लवी पाटील यांच्याकडे कार्यभार सोपविल्याने महाबळेश्वरकरांचा विकास कामांचा मार्ग मोकळा झाला.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची काही दिवसांपूर्वीच पदोन्नती होऊन मुख्याधिकारी (गट अ संवर्ग) म्हणून उमरखेड नगरपरिषद जि. यवतमाळ येथे बदली झाली. या बदलीमुळे रिक्त झालेल्या महाबळेश्वर मुख्याधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार पांचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्याकडे होता.
नुकताच बुधवारी ०४ मे रोजी आलेल्या शासन आदेशाने पल्लवी पाटील यांची कर संकलन व निर्धारक अधिकारी,सांगली – मिरज – कुपवाड या रिक्त पदावर २ वर्षांच्या कालावधीकरता प्रतिनियुक्ती करण्यात आली असून महाबळेश्वर पालिका मुख्याधिकारी या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील पुढील आदेशापर्यंत पल्लवी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पल्लवी पाटील यांच्याकडे महाबळेश्वर पालिकेचा कारभार आला आहे.
महाबळेश्वर पालिका मुख्याधिकारी म्हणून पल्लवी पाटील यांनी गत दिड वर्षे कामाचा धडाका लावला होता महाबळेश्वरचा चेहरामोहरा बदलण्याची कार्यक्षमता,कामाची धडाडी,निर्णय क्षमता असलेल्या अधिकारी अशी त्यांनी ओळख निर्माण केली आहे.