पहिल्या दिवशी बायडेन करणार ‘या’ 15 आदेशांवर स्वाक्षरी

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या 48 व्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही तासातच ज्यो बायडेन 15 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार आहेत. त्यामध्ये वातावरण बदलाविषयीच्या पॅरिस करारामध्ये पुन्हा सहभागी होणे, 100 दिवस मास्कचा वापर अनिवार्य करणे आणि मुस्लिमांबाबतच्या काही बंदी आदेशांना रद्द करण्याच्या आदेशांचाही समावेश असेल. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या काही धोरणात्मक निर्णयांना रद्द करण्याच्या आदेशांवरही ते स्वाक्षरी करणार आहेत, अशी माहिती व्हाइट हाउसच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रस्तावित ‘इमिग्रेशन’ कायद्यानुसार बेकायदेशीर शरणार्थ्यांसाठी 8 वर्षांच्या योजनेची तरतूद प्रस्तावित आहे. प्रत्येक देशातून अमेरिकेत रोजगारासाठी येणाऱ्यांवर सध्या काही निर्बंध लागू आहेत. ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी प्रत्येक देशातून येणाऱ्या बेरोजगारांची संख्या निश्‍चित केली गेली आहे. याचा फायदा आयटी उद्योग क्षेत्रातील हजारो भारतीयांना मिळतो. या भारतीयांना अनेक दशकांपासून ग्रीनकार्डची प्रतिक्षा आहे.

बायडेन अध्यक्ष झाल्यावर आणखी दोन क्षेत्रातील सुधारणांच्या आदेशांवर स्वाक्षरी करणार आहेत. बायडेन पहिल्याच दिवशी एकूण 15 आदेशांवर स्वाक्षरी करणार आहेत. बायडेन यांच्या पूर्वीच्या चार अध्यक्षांनी पहिल्या दोन दिवसात एकाच आदेशावर स्वाक्षरी केली होती, अशी महिती व्हाइट्‌ हाउसचे प्रसिद्धी सचिव जेन साकी यांनी सांगितले.

अध्यक्ष झाल्यावर पहिले 10 दिवस बायडेन आदेशांवर स्वाक्षरीसाठीचे काम करणार आहेत. त्यात कोविड-19 च्या उपाय योजना, आर्थिक मदत, पर्यावरण बदलाचा आंतरराष्ट्रीय करार आणि वांशिक समानतेबबतच्या तरतूदींचा समावेश असेल.

याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकेने बाहेर पडण्याचा निर्णय रद्द करून पुन्हा सहभागी होण्याची प्रक्रियाही ते सुरू करणार आहेत. त्यासाठी “डब्लूएचओ’च्या कार्यकारी बैठकीमध्ये प्रख्यात साथरोग तज्ञ्‌ डॉ. ऍन्टनी फॉसी यांच्या नेतृत्वाखाली बायडेन प्रशासनाचे प्रतिनिधींचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. कोविड प्रतिसादासाठी समन्वयाची नेमणूकही बायडेन करणार आहेत.

वांशिक असमानतेला समाप्त करण्यासाठीही बायडेन महत्वाचे पाऊल उचलणार आहेत. कृष्णवर्णिय, लॅटिन, स्वदेशी आणि मूळ अमेरिकन, आशियाई अमेरिकन आणि पॅसिफिक आयलॅंडर्स, एलजीबीटीक्‍यू, अपंग आणि धार्मिक अल्पसंख्याक यासारख्या समुदायांमधील सर्व व्यक्तींना समानतेची वागणूक मिळेल, याची काळजी ते घेणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.