मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. राज्यात ज्याप्रमाणे सर्व विरोधक एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यात यश आले तसेच केंदीय स्तरावर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याचा एक भाग म्हणून काल दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ब्रेकफास्टचे आयोजन केले होते. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.या सर्वात चर्चेचा विषय ठरला तो एक फोटो. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राहुल गांधी यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असल्याचे दिसत आहे. याच फोटोवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“सध्या आम्ही महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहोत. हातातला हात खांद्यावर आला इतकंच. आमचे चांगले संबंध आहेत. एकत्र राज्य, सरकार चालवताना फक्त पक्ष नाही तर मनही जवळ यावी लागतात. त्यादृष्टीने काही पावलं पडत असतील तर लोक स्वागत करतील,” असे संजय राऊत म्हणाले.
“राहुल गांधी यांची आणि माझी सातत्याने चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरेंचे काही निरोपही मी त्यांना दिले आहेत. महाविकास आघाडीबाबत तेदेखील समाधानी आहेत. सरकार एकत्रितपणे चालत असल्याचा त्यांना आनंद आहे,” असे संजय राऊत यांनी सांगितले. राहुल गांधी यांची शिवसेनेच्या कार्यशैलीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. राहुल गांधींना बाळासाहेबांचा स्वभाव आणि त्यांच्या कार्यशैलीबद्दल जाणून घ्यायचे आहे. शिवसेना प्रमुखांनी पक्ष आणि नेत्यांना कशा पद्धतीने हाताळले आणि त्याचे इतर पक्षांच्या नेत्यांशी कसे संबंध होते, हेही त्यांना जाणून घ्यायचे आहे.
शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जाणून घेण्यास ते अत्यंत उत्सुक दिसत होते. एवढेच नाही, तर राहुल गांधी महाराष्ट्र दौरा आणि युतीच्या सर्व नेत्यांना भेटण्यासंदर्भातही बोलले आहेत, असेही राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाल्यापासूनचा राहुल गांधींचा हा पहिलाच दौरा असेल.
‘राहुल गांधी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, असे त्यांनी मला सांगितले. मात्र, ते कधी येणार हे त्यानी सांगितले नाही. काँग्रेस प्रवक्ते गोपाल तिवारी यांनी म्हटले आहे, की राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या भेटीबाबत काँग्रेस मुख्यालयातून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. वेळ निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याची घोषणा करतील अशी माहिती आहे.