मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभे’त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. शरद पवार हे नास्तिक असल्याचा उल्लेखही राज यांनी आपल्या भाषणामध्ये केला. तर सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहेत, अशी टीका राज यांनी केली़.
अजित पवार यांच्यावर छापेमारी होते, पण, सुप्रिया सुळे यांच्यावर अशी कारवाई होत नाही. आपल्याच पक्षातील नेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पवार हे मोदींना भेटत तर नसावेत ना. असं म्हणत राज ठाकरे यांनी पवार कुटुंबावर गंभीर आरोप केले. याच टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.
अजित पवार म्हणाले,’राज ठाकरेंना एवढं महत्त्व देऊ नका. सध्या माझ्याकडे तेवढा वेळ नाही. मात्र योग्य वेळी मी नक्कीच उत्तर देईन, त्याची काळजी करु नका. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे.’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, राज ठाकरे यांनी ठाण्यातील ‘उत्तर सभेत चौफेर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पवार कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे.