नवी दिल्ली – दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा करोनाचा फैलाव सुरू झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद आणि नोएडा येथील शाळांमध्ये करोनाचे रुग्ण आढळ्याचे दिसून येत आहे. शाळकरी मुलांमध्ये करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे तणाव वाढला आहे. गाझियाबाद आणि नोएडातील अनेक शाळांमध्ये करोनाने थैमान घातल्यानंतर येथील अनेक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वसुंधरा येथील जयपूरिया शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यी करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे पुढील आदेशापर्यंत शाळा बंद करण्यात आली आहे. मात्र, ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत. गाझियाबादमधील सेंट फ्रान्सिस स्कूल आणि केआर मंगलम स्कूलमध्ये करोनाची प्रकरणे समोर आली आहेत. याआधी रविवारी (10 एप्रिल 2022) गाझियाबादमधील एका खासगी शाळेत करोनाची लागण झालेली मुले आढळल्यानंतर आठवडाभर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ऑनलाइन वर्ग सुरू केले.
याशिवाय नोएडाच्या तीन खासगी शाळांमध्ये 15 मुले आणि 3 शिक्षक करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ऑफलाइन वर्ग बंद करून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. 11 एप्रिल रोजी नोएडा सेक्टर 40 येथील खेतान पब्लिक स्कूलमध्ये एकाच वेळी करोनाचे 13 प्रकरणे समोर आली होती, ज्यामध्ये मुलांसह 3 शिक्षकांना संसर्ग झाला होता. करोनाची ही प्रकरणे पाहता शाळा व्यवस्थापनाने सध्या ऑफलाइन अभ्यासावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर 18 एप्रिलपर्यंत शाळेतील सर्व वर्ग ऑनलाइन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.